गडचीरोली पोलीसांच्या हाती मोठ यश; 50 लाखांचं बक्षीस जाहीर
। गडचीरोली । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कामांडोंसोबत झालेल्या चकमकीत शनिवारी 26 नक्षलवादी ठार झाले. सुमारे चार तास चाललेल्या या चकमकीत जहाल नक्षली नेता व डॉन संबोधला जाणारा मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला आहे. मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याने नक्षलींना मोठा झटका बसला आहे. गडचिरोली पोलिसांनी या माहिती दुजोरा दिला आहे. चकमकीत तीन पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले आहे.
मलिंद तेलतुंबडे हा कुख्यात माओवादी नेता होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो भूमिगत होता. तेलतुंबडे मूळचा महाराष्ट्रातील असून यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावचा रहिवासी होता. 32 वर्षांपूर्वी त्याने चंद्रपूरला अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेतून कामाला सुरुवात केली होती. वेकोलि कंपनीच्या अधिकार्याच्या खुनानंतर तो बेपत्ता झाला. तो नक्षलींच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड क्षेत्रीय समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. कॉम्रेड एम, दीपक, सह्याद्री अशा वेगवेगळ्या नावांनी नक्षलवाद्यांमध्ये त्याची ओळख होती. नक्षलवादी चळवळ शहरी भागात रुजवण्यात त्याचा हात होता. केंद्र सरकारच्या मोस्ट वॉण्टेड नक्षलवाद्यांच्या यादीत त्याचा सहभाग होता. त्याच्यावर हत्या देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल होते.
सी-60 पोलीस दल नक्षलविरोधी मोहीम राबवीत असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एक मोठा नक्षलवादी म्होरक्या ठार झाल्याची माहिती आहे. चकमकीत अनेक नक्षलवादी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची जंगलातील शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. चकमकीनंतर घटनास्थळावर अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली. त्यानंतर नक्षलविरोधी अभियान पथकाने घटनास्थळी शोधमोहीम राबविली. या मोहिमेत दुपारपर्यंत 10 ते 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. मात्र नक्षलविरोधी अभियान पथकाने जंगलात शोध घेतला असता रक्ताचा सडा आढळला. त्यानंतर घनदाट जंगलात शोध घेण्यात आला असता नक्षलवाद्यांचे आणखी 14 मृतदेह आढळले.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेआठ वाजेपर्यंत 26 नक्षलवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावर ताब्यात घेण्यात आले. ते रात्री उशिरा गडचिरोली येथे आणण्यात आले. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.