उच्च न्यायालयाकडून एक लाखाचा जामीन मंजूर; शिक्षा कायम, आमदारकी धोक्यात
| मुंबई | प्रतिनिधी |
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी पार पडली. त्यात त्यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, ते दोषी असल्याचे न्यायालयाने मान्य करीत त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची तुरुंगवारी तूर्तास टळली आहे. परंतु, त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार कायम आहे.
नाशिक सदनिका प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, हे प्रकरण 1995 सालचं आहे. दरम्यान, त्यानंतर याच प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं. अटक वॉरंट जारी होताच माणिकराव कोकाटे यांची तब्येत बिघडली, त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोकाटे यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्यात न्यायालयाने नकार दिला होता. शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाकडून दाखवण्यात आली होती. त्यानुसार आज या प्रकरणावर सुनावणी पार पडली.
या प्रकरणात कोकाटे यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने कोकाटे यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता तूर्तास तरी कोकाटे यांची अटक टळली आहे. मात्र, न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही. कोकाटे यांना जामीन मंजूर झाल्यामुळे सध्या तरी त्यांची तुरुंगवारी टळली आहे.







