उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रदान
। मुंबई । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आ. बाळाराम पाटील यांना विधान परिषदेत समाजाचे विविध प्रश्न मांडल्याबद्द्ल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान भवनात झालेल्या भव्य कार्यक्रमात सन 2020/21 सालचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेतील 53 आमदारांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व ग्रंथाचे प्रकाशन तसेच उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचा वितरण समारंभ मुंबईतील विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी (दि. 3) पार पडला.
राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय जयकाराने केली. महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणं शक्य नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून विविध महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेल्या महाराष्ट्राने देशात अनेक कायदे, सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली आहे. सध्याच्या काळात उपसभापती डॉ. नीलम गोर्हे या विधान परिषदेतील महिला परंपरेला पुढे घेऊन जात आहेत. तसेच महिला उपसभापती असणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गगार राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांनी काढले. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते.
