माजी आमदार धैर्यशील पाटील यांना ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार जाहीर

मान्यवरांच्या उपस्थितीत, पीठासीन अधिकाऱ्यांच्या हस्ते होणार सन्मान

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेचा सन २०१७ – १८ सालाचा ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार शेतकरी कामगार पक्षाचे नेते, पेण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाई धैर्यशील पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण याकरिता २०१५ – १६, २०१६ – १७, २०१७ – १८ सत्रातील विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत व पीठासन अधिकाऱ्यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता विधान भवनातील राष्ट्रकुल संसदीय समिती कक्षात होणाऱ्या कार्यक्रमात हा  पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.

भाई धैर्यशील पाटील यांनी आपल्या कार्यकाळात संसदीय लोकशाही संकेत पाळून अत्यंत अभ्यासपूर्वक अनेक प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले होते.याचीच दखल घेऊन राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे त्यांना ‘उत्कृष्ट भाषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार भाई जयंत पाटील, जेष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख, माजी मंत्री मिनाक्षी ताई पाटील, माजी आमदार भाई संपतरावबापू पवार पाटील,प्रा.एस.व्ही.जाधव, खजिनदार भाई राहुल पोकळे,कार्यालयीन चिटणीस भाई ॲड.राजेंद्र कोरडे यांचेसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version