| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील मातब्बर नेते माजी आमदार सुरेश लाड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना पक्ष संघटनेत पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले असून तिन्ही आमदारांना सोबत घेवून त्यांनी रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी मजबूत करावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर येथे शनिवारी 16 डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकी प्रारंभी माजी आमदार लाड यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडला. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, मंत्री रवींद्र चव्हाण,माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे रायगड जिल्ह्यातील स्थानिक आमदार उपस्थित होते.
लाड यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी चव्हाण, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती, नरेश पाटील, कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, खालापूर तालुका महिला अध्यक्ष श्वेता मनवे, खालापूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष राजेश हजारे, तालुका कार्याध्यक्ष विजय हजारे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष जगदीश ठाकरे, उद्योजक राम राणे, कर्जत युवक तालुका अध्यक्ष सागर शेळके, राष्ट्रवादी युवती मोर्चा कोकण संघटक प्रतीक्षा लाड, कर्जत अल्पसंख्याक शहराध्यक्ष बिलाल आढाल, कर्जत शहर माजी अध्यक्ष नंदकुमार लाड, माजी सरपंच वेणगाव देविदास बडेकर, होणाड ग्रामपंचायत उपसरपंच समीर देशमुख, माजी उपसरपंच सुनील सुखदरे, गोरठण ग्रामपंचायत माजी उपसरपंच राकेश जाधव, कर्जत शहरातील कृष्णा जाधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.