| पुणे | प्रतिनिधी |
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी (दि. 6) दीर्घ आजाराने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते आणि घरीच उपचार घेत होते. आज सकाळी पुण्यातील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई तसेच नातवंडं असा परिवार आहे. त्यांचं पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील एरंडवणे येथील कलमाडी हाऊस येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता नवी पेठ, पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमध्ये झालं, तर उच्च शिक्षण त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यांनी 1960 साली नॅशनल डिफेन्स अकॅडमीत प्रवेश घेतला. 1964 ते 1972 या कालावधीत त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवा बजावली. याच काळात त्यांनी 1965 आणि 1971 च्या भारतपाकिस्तान युद्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. भारतीय वायू सेनेत कार्यरत असतानाच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पुण्यात काँग्रेस संघटनेची धुरा सांभाळत पक्षवाढीसाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. सुरेश कलमाडी हे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तसेच, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्षही होते. पुणे शहरात काँग्रेस पक्षाची वाढ करण्यास त्यांचा मोठा वाटा होता. पुणे पॅटर्न तसेच पुणे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवसारख्या अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले होते.
2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप झाल्यामुळे त्यांना अटकही झाली होती. पुणे शहरातील नेतृत्व आणि राजकीय समीकरणं सांभाळण्यातही कलमाडी अग्रेसर होते. पुणे पॅटर्नसारख्या उपक्रमांसह त्यांनी राबविलेल्या कामांची आजही चर्चा होते. त्यांच्या निधनानं काँग्रेस पक्षाला तसेच, पुणे शहरात मोठा धक्का बसला आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन
