दोन जण गंभीर जखमी
। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर खांबनजीक रविवारी (दि.1) फॉर्च्यूनर कार आणि एसटी बसमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चालक व त्याची पत्नी हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
कोलाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. एसटी बस (एमएच-08-एपी-5825) वरील चालक संतोष काशीराम बुधकर (40) हे मुंबई-खेड ही बस घेऊन मुंबईकडून कोलाडकडे येत होते. तर, संतोष मेढेकर हे आपल्या ताब्यातील फॉर्च्युनर कार (एमएच-06-बीयू-9936) हे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने मुंबईकडे जात होते. त्याचवेळी त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि समोरून येणार्या एसटी बसवर जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालक संतोष मेढेकर व त्यांच्या पत्नी कविता मेढेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, दोघेही कारमध्ये अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तात्काळ कारमधील जखमींना बाहेर काढले आणि त्यांना पुढील उपचारासाठी सुकेळीतील जिंदाल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. या अपघातात फॉर्च्युनर कारचे प्रचंड नुकसान झाले असून, एसटी बसचेही मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास कोलाड पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नागे करीत आहेत.