। महाड । उदय सावंत ।
ऐतिहासिक किल्ले रायगडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खननादरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण ‘यंत्रराज’ अर्थात ‘सौम्ययंत्र’ सापडले आहे. या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतींचा वापर झाल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा हाती लागला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
प्राचीन कालखंडापासून ग्रह-तार्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी ‘अॅस्ट्रोलेब’ हे यंत्र वापरण्यात येत होते. त्याला ‘यंत्रराज-सौम्ययंत्र’ या नावानेही ओळखले जाते. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून या यंत्राचा वापर केला जात असे. भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नांनी दुर्गराज रायगड येथे मागील काही वर्षांपासून उत्खननाचे कार्य सुरू आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून गडाच्या विविध भागात, म्हणजेच रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील बाजूस ते कुशावर्त तलावापर्यंत व बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या भागांमध्ये जे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत, अशा जवळपास 10 ते 12 ठिकाणी हे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कुशावर्त तलावाच्या वरील भागात व पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिराच्या मधील भागात असलेल्या ऐतिहसिक वाड्याच्या जागेवर उत्खनन कार्य राबवित असताना त्याठिकाणीच हे प्राचीन यंत्रराज-सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. शिवकाळात रायगडाचे बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण पुरावा सापडला असल्याचे बोलले जात आहे.
इतिहास अभ्यासकांना मोठी संधी
या यंत्रराजच्या वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव/सापसदृश्य दोन प्राण्यांचे अंकन केलेले आहे. त्यांचे मुख आणि शेपटी कुठल्या दिशेला असावी, हे समजण्यासाठी वरील बाजूस ‘मुख’ आणि ‘पूंछ’ अशी अक्षरेसुद्धा कोरलेली आहेत. यावरून उत्तर आणि दक्षिण दिशा कुठे असावी, याचा अंदाज बांधणे सोपे जात असावे. या सापडलेल्या अमूल्य ठेव्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे.