| तळा | वार्ताहर |
सध्या सर्वत्र भातशेती पिकून तयार झाली असल्याने भातकापणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, भातकापणीच्या हंगामात विंचूदंशाच्या घटनेतदेखील वाढ झाली असून, महिनाभरात जवळपास 40 जणांना विंचूदंश झाल्याची घटना घडली आहे.
यावर्षी परतीच्या पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लांबलेल्या पावसामुळे भातकापणीला उशिरा सुरुवात झाली असून, कधीही पाऊस कोसळत असल्यामुळे घाईघाईनेच भातकापणी केली जात आहे. परंतु, भातकापणी करताना अनेकदा बेसावध असल्यामुळे विंचूदंशाचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे भातकापणी करताना नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामध्ये शेतात काम करताना पायात गमबूट वापरणे, हातात रबरी हॅन्डग्लोज घालणे, डोक्यात टोपी घालणे यांसारख्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण भागात बहुतांश वेळा विंचू दंश झाला तर त्याला सुरुवातीला मांत्रिकाकडे विष उतरविण्यासाठी नेण्यात येते. मात्र, यामुळे उशीर होऊन वेळप्रसंगी त्या रुग्णाच्या शरीरात विष पसरले जाऊन जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे विंचूदंश झाल्यास रुग्णाला उपचारासाठी त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करावे जेणेकरून वेळेवर उपचार झाल्याने त्या रुग्णाचे प्राण वाचतील, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.