ढोल पथकाचा स्वप्नपूर्ती दिवस
| खांब | नंदकुमार मरवडे |
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक सोहळा नुकताचा राजधानी रायगड किल्ल्यावर पार पडला. या शिवराजाभिषेक सोहळ्यात रोहा तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या स्फूर्ती प्रतिष्ठान ढोल-ताशा ध्वज पथकाला वादनाची संधी मिळाल्याने हा दिवस त्यांच्यासाठी स्वप्नपूर्ती दिवस ठरला आहे. त्यासाठी रोहा तालुक्यासह जिल्हाभरातून आनंद व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे स्फूर्ती प्रतिष्ठान आपल्या कार्याचा दशकपूर्ती सोहळा साजरा करत असतानाच हा बहुमान प्राप्त झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवराज्याभिषेक सोहळ्यात रायगड जिल्ह्याबाहेरील ढोल-ताशा पथकांना वादनाची संधी दिली जात होती. मात्र, यंदा प्रथमच स्फूर्ती प्रतिष्ठानच्या रूपाने रायगड जिल्ह्यातील पथकाला हा सन्मान मिळाल्याने ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन वातावरणात स्फूर्ती प्रतिष्ठानच्या वादकांनी ढोल-ताशांच्या गजरात उपस्थित शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण केले. त्यांच्या शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थित मान्यवर आणि शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
पुणे येथे झालेल्या शिवराज्याभिषेक राज्यव्यापी बैठकीत मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी गठित केलेल्या समितीच्या आदेशाने स्फूर्ती प्रतिष्ठान ढोल पथकाने आपल्या तयारीचे रणशिंग फुंकले व पथकाचे निमंत्रण पथक प्रमुख सुशिल बामणे यांनी स्वीकारले. गेल्या दोन महिन्यांपासून स्फूर्ती प्रतिष्ठानने “एकच धून सहा जून” हे ब्रीद वाक्य आपल्या माथी ठेवत सर्व वादकांनी स्वतःला तयारीसाठी झोकून दिले. पथकाचे अध्यक्ष सुमित रिसबूड, पथक प्रमुख सुशिल बामणे, वादक अव्यग्र गोखले, विकी ठमके, किरण मोरे, प्रतीक कांबळे, शुभम दळवी, श्रवण कदम, समीर कुथे, शुभम म्हात्रे, रोहन वाळंज, अनिष गुरव, यश पवार, निशांत पाटील, साहिल भोकटे, शैलेश जमादार, अंश गोळे, क्षितिज गोविलकर, रुद्र देवरुखकर, उदित कदम, आर्या देशपांडे, वैष्णवी बागडे, संयुक्ता देशमुख, वैदेही महाडिक, चैताली गुरव, ओम बामुगडे, दिक्षा लुष्टे, आकाश बेलंबे आणि दिनेश या सर्व वादकांसह त्यांचे पालक व पथकाचे शुभचिंतक या ऐकतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. या यशाबद्दल राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्फूर्ती प्रतिष्ठानचे पदाधिकारी, प्रशिक्षक, वादक आणि सर्व कार्यकर्त्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच, भविष्यातही संस्थेच्या कार्याला अशीच यशस्वी वाटचाल लाभो, अशा शुभेच्छा विविध स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.
संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण
स्फूर्ती प्रतिष्ठान गेल्या 10 वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरांचे जतन करण्यासाठी कार्यरत आहे. तसेच युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, संघटनशक्ती आणि संस्कार रुजविण्याचे कार्य सातत्याने करत आहे. त्यामुळे रायगडाच्या भूमीला लाभलेला हा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
