तरुण व लहानग्यांमध्ये उत्साह
| पाली/बेणसे | वार्ताहर |
गणेशोत्सवात ढोल-ताशा-ध्वज पथकाला अधिक पसंती आहे. जिल्ह्यात लहानग्यांसह तरुणाईमध्ये ढोल-ताशा या पारंपारीक वादनाची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. गणेशोत्सवात आपल्या ताल व लयबद्ध वादनाने हे ढोलताशा पथक सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या गणेशोत्सवासाठी नवीन लय, ठेका व तालावर बहुतांश ढोल ताशा पथकातील सदस्य सध्या सरावातून अतोनात मेहनत घेत आहेत. ढोलताशा पथक हे नियमीत सर्व करून आपली आगळी वेगळी छाप कार्यक्रमात पाडताना दिसतात.
पारंपरिक संस्कृती टिकावी आणि तरुणांमध्ये विविध कौशल्यांचा विकास व्हावा या दृष्टीने जिल्ह्यातील अनेक ढोल-ताशा-ध्वज पथक प्रयत्न करतांना दिसत आहेत. जिल्ह्यात साधारण 15 ते 20 ढोलताशा पथक आहेत. डिजे व डॉल्बी पेक्षा आता पारंपारीक वाद्यांकडे सगळेच जण आकृष्ट होत आहेत. गणेशोत्सव, शिवजयंती, शिवराज्याभिषेक, नवरात्र, पाडवा अशा विविध सणांमध्ये हमखास ढोल-ताशा पथक आपल्या पारंपारीक कलेचा नमुन मोठ्या प्रमाणात सादर करतांना दिसतात. काही ढोलताशा पथक अनेक सामाजिक उपक्रम देखिल राबवितात. गणपतीमध्ये गणेशाचे आगमन व विसर्जनावेळी गणेशापुढे मानवंदना दिली जाते.
प्रचंड मेहनत गणपती निमित्त जवळपास दिड महिना आधीपासून सराव सुरु होतो. बहुतांश पथकांचा सायंकाळी 5 ते 8 या वेळेत जंगी सरवा चालतो. पथकात साधारण 8 ते 9 वयोगटापासून 45 वर्षे वयोगटाचे सदस्य असतात. शेकडो सदस्य प्रशिक्षित झाले आहेत. सदस्यांना सरावासाठी नियमित हजर राहून मेहनत घ्यावी लागते. काही पथक सदस्यांकडून शुल्क घेतात तर काही घेत नाहीत.
नियमांचे पालन प्रत्येक ढोल-ताशा पथकाचे स्वतःचे असे काही नियम असतात. ते प्रत्येक सदस्यांना तंतोतंत पाळावे लागतात. त्यामध्ये व्यसनाधिनता व गैरवर्तन चालत नाही. सरावास नियमित हजर राहणे, ठरविलेला गणवेश परिधान करावा, मुलींनी मुलींचा ढोल स्वतः ताणावा (ओढावा) व त्यांनीच तो उचलावा, पालकांची परवानगी आवश्यक, रात्री उशीर झाल्यास मुलींना घरी सोडण्यास जाणे. आणि सर्व सदस्यांनी शिस्तीचे व नियमांचे पालन करावे.
गणेशोत्सव काळात ढोलताशा पथकांना खूप मागणी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात सराव करत आहोत. तरुणांसह लहान मुले देखील मोठ्या प्रमाणात या पारंपारीक वादनाकडे आकर्षित होत आहेत. कित्येकांना ढोल हातात मिळाला नाही तर ते बैचेन होतात.
उमेश तांबट, सदस्य, वीर गर्जना पारंपरिक ढोल-ताशा पथक, पाली
मागील आठ वर्षांपासून ढोलताशा पथकात वादक आहे. पारंपारिक वादन याबरोबरच येथून शिस्तबद्धता देखील अंगी बाणवते. नियमित सराव करतो. गणपती सणासाठी तर जय्यत तयारी सुरू आहे.
अनिकेत महाडिक, तरुण वादक