| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले आहे. शुभांशू हे सुमारे 18 दिवस अवकाशात होते, या काळात त्यांनी अनेक प्रयोगही केले. शुभांशू शुक्ला हे 25 जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन 9 रॉकेटने अंतराळात गेले होते. आता ते सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये वास्तव्य करणारे पहिले भारतीय ठरलेले अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे 18 दिवसांच्या मोहिमेनंतर सुखरूपपणे पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशू शुक्ला आणि इतर चार अंतराळवीरांना घेऊन येणारं यान भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियामधील समुद्र किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरामध्ये सुखरूपपणे उतरले.
शुभांशू शुक्ला हे ॲक्सिओम मिशन 4 या मोहिमेचा भाग होते. त्यांनी 18 दिवस अंतराळात वास्तव्य करताना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये विविध प्रयोग केले. दरम्यान, मंगळवारी स्पेसएक्सचे ग्रेस हे यान शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर चार जणांना घेऊन सुखरूप पृथ्वीवर परतले. शुभांशू शुक्ला हे अमेरिका, पोलंड, हंगेरीतील आपल्या 3 सहकारी अंतराळवीरांसह 25 जून 2025 रोजी ड्रॅगन या अंतराळ यानामधून फाल्कन 9 या रॉकेटच्या मदतीने अंतराळात गेले होते. 26 जून रोजी ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये पोहोचले. तिथे शुभांशू शुक्ला यांनी 60 हून अधिक शास्त्रीय प्रयोग केले. त्यामध्ये अंतराळात स्नायूंचं होणारं नुकसान, मानसिक आरोग्य आणि अंतराळात धान्य रुजवण्यासारख्या प्रयोगांचा समावेश आहे. दरम्यान, कॅलिफोर्नियातील समुद्र किनाऱ्याजवळ शुभांशू शुक्ला आणि इतर अंतराळवीरांना घेऊन येणारं यान उतरल्यानंतर सर्व अंतराळवीरांना यानातून सुखरूपपणे बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. आता त्यांना सुमारे 10 दिवस क्वारेंटाईनमध्ये ठेवलं जाईल. यादरम्यान, त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवलं जाईल.
शुभांशू भारताचे दुसरे अंतराळवीर
शुभांशू शुक्ला हे 1984 नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे अंतराळवीर आहेत. यापूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला होता. शुभांशू यांच्या या मोहिमेनंतर भारत आगामी काळात अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शुभांशू यांची ही मोहीम खास आहे.
कोण आहेत शुभांशू?
शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलात स्क्वाड्रन कमांडर आहे. त्यांना 2000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. शुभांशू यांनी आपल्या 18 दिवसांच्या अंतराळातील कार्यकाळात 60 हून अधिक प्रयोगांमध्ये भाग घेतला आहे. ज्यात भारताच्या 7 प्रयोगांचा समावेश आहे. शुभांशू यांनी अंतराळात मेथी आणि मूगाचे बीजचा अभ्यास केला.
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला त्यांच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेतून पृथ्वीवर परतत असताना त्यांचं मी स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून, त्यांनी त्यांच्या समर्पण, धैर्य आणि अग्रगण्य भावनेने अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली. हे आपल्या अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने आणखी एक मैलाचा दगड आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी





