। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
आरेवारे येथे पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा शनिवारी (दि.19) समुद्रात बुडून मृत्यू झाला. त्यात तीन बहिणी आणि एकजण त्यांच्यापैकी एकीचा पती आहे. खवळलेल्या समुद्रात लाटांचा अंदाज न आल्याने चौघेजण बुडाले. स्थानिक व्यावसायिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. उज्मा शेख (18), उमेरा शेख (29), जैनब काझी (26), जुनैद काझी (30) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे-मुंब्रा येथून उज्मा शेख, उमेरा शेख या दोघी रत्नागिरीतील त्यांची बहीण जैनब काझी हिच्याकडे आल्या होत्या. शनिवारी सायंकाळी त्या तिघी आणि जैनब काझी हिचा पती जुनैद काझी असे चौघेजण आरेवारे येथे फिरण्यासाठी गेले होते. या चौघांना पाण्यात जाण्याचा मोह आवरला नाही. समुद्र खवळलेला असताना उसळलेल्या मोठ्या लाटेमुळे चौघेही पाण्यात ओढले गेले. काही वेळ एकमेकांना वाचवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडा सुरू केला. ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न असफल ठरले. पोलिसांनी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घाेषित केले.







