मांडव्यातील चार घरफोड्या उघडकीस

| अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड पोलीस दलातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार घरफोड्या उघडकीस करण्यास रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. 2021 व 2022 मध्ये या घरफोड्या झाल्या होत्या. या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात आले आहे.

मांडवा बंदराचा विकास होत असताना गुन्हेगारीचे प्रमाणही वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. बंद घराचे कुलूप, खिडकी तोडून चोरी, घरफोडीच्या घटना सतत घडत आहेत. मागील पंधरा दिवसापुर्वी सासवणे परिसरातील बंद असलेल्या या शाळेतून घरफोडी करून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला होता. या गुन्ह्यातील तिघांना पकडण्यास मांडवा सागरी पोलीसांना यश आले. या गुन्हयातील आरोपी एक स्थानक व दोघेजण भंगार विक्रेते असल्याचे समोर आले आहे.

मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2021 व 2022 मध्ये चार घरफोड्या झाल्या होत्या. या घरफोड्यांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या पथकाने वेगवेगळ्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेऊन यातील मुख्य आरोपीला जेरबंद केले. त्याच्या समवेत एका महिलेलादेखील अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी करणार्‍या या चोरट्यांना मांडवा सागरी पोलीस ताब्यात घेऊन त्यांची आणखी सखोल चौकशी करण्याची शक्यता आहे.

Exit mobile version