स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
। अलिबाग । प्रतिनिधी ।
घरफोडी गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला बुधवारी (ता.3) अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई करून मांडवा व अलिबाग मधील दहा गुन्हे उघडकीस आणले. अलिबाग व मांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे वाढले होते. मालमत्ता सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व प्रभारी अधिकारी अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, सहाय्यक फौजदार दिपक मोरे , पोलीस हवालदार प्रशांत दबडे, अमोल हंबीर, अक्षय जगताप व पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे आदी पथकाने शोध सुरु केला. दागीने चोरीसह घरातील कपडे धान्य देखील चोरणार्याची माहीती घेण्यात आली. त्यामध्ये मांडवा परिसरातील घरफोडी गुन्हयातील आरोपी असल्याची माहीती मिळाली. त्या चोरट्याचा शोध सुरू केला.तो चोरटा नवगांव परिसरात असल्याची माहीती अमोल हंबीर व ईश्वर लांबोटे यांना मिळाली. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. बुधवारी पहाटे नवगांव भागात जंगलात शोधा शोध सुरू केली. परंतू त्याला चुणूक लागल्यावर पळ काढला. दोन-तीन तास चोर पोलीस खेळ सुरू होता. अखेर त्याला पकडण्यास यश आले. त्याला अटक करून बुधवारी दुपारी अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मांडवा व अलिबाग हद्दीतील दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.
संदीप निषाद (वय.25)असे या आरोपीचे नाव आहे. हा मुळचा उत्तरप्रदेश राज्यातील सुलतानपूर येथील रहिवासी आहे. गेल्या आठ वर्षापुर्वी तो अलिबाग तालुक्यात नोकरी व्यवसाया निमित्त आला होता. सुरुवातीला तांडेल म्हणून बोटीवर काम करायचा. पैसे अधिक कमवण्याच्या हव्यासा पोटी त्याने बंद घरात घरफोडी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला घरातील कपडे धान्य चोरत होता. त्यानंतर त्याने दागीने लंपास करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी त्याच्या विरोधात मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात त्याला शिक्षाही झाली होती .शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याने चोरी, घरफोडीचा धंदा सुरुच ठेवला. नवगावमधील झुडपात, जंगल भागात तसेच रेल्वे पटरीच्या परिसरात तो राहत होता. लोक वस्तीमधून राहणारा संदीप निषाद हा बंद घरांची रेकी करत होता. त्यानंतर वेळ साधून तो घरफोडी करत होता. त्याने अलिबाग व मांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड झाले आहे .