| पनवेल | वार्ताहर |
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सहजतेने आवश्यक रक्त तसेच रक्त घटक उपलब्ध व्हावेत, यासाठी खारघरमध्ये तब्बल सहा कोटी खर्च करून राज्यातील पहिल्या रक्तसंक्रमण परिषद केंद्राची इमारत बांधण्यात आली, पण या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्याने ती इमारत धूळ खात पडून आहे.
राज्यात सुरक्षित रक्तचा मुबलक पुरवठा वाजवी किमतीत व्हावा, तसेच रक्तसंक्रमण सेवेत असलेल्या मनुष्यबळाचा तुटवडा लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळ विकसित करण्याचा दृष्टिकोनातून आणि अस्तित्वात असलेल्या कर्मचार्यांचा बळकटी आणि राज्यातील रक्तपेढ्यामधील डॉक्टर्स, तंत्रज्ञ, स्टाफ नर्ससाठी रक्तदान शिबिर तसेच प्रशिक्षणासाठी खारघर सेक्टर वीस प्लॉट चौदा अ या ठिकाणी पाचमजली स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. कर्मचार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार इमारतीचे काम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झालेले आहे. मात्र, शासनाच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे रक्त संक्रमण केंद्राची इमारत सुरु होण्यास विलंब होत आहे.
प्रशिक्षणाची अद्ययावत सुविधा
या इमारतीमध्ये देशातील इच्छुक उमेदवाराची निवड करून या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या रक्तसंक्रमण केंद्रात रक्त जमा करण्याचे केंद्र, प्रयोग शाळा, लायब्ररी, संगणक रूम, संशोधन केंद्र, कॉन्फरन्स हॉल, निवासी वसतिगृह आदीची सोय आहे. तसेच या केंद्रातून हजारो तरुणांना प्रशिक्षण देऊन रक्तसंक्रमणच्या कामात मदत होणार आहे.