महाराष्ट्र अंनिस राबविणार प्रबोधन अभियान
| पाली/बेणसे | वार्ताहर |
एनसीइआरटीने दहावीच्या अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान सांगणारा भाग वगळलेला असल्याची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली आहे. अनुवांशिकता आणि उत्क्रांती या विषयी दहावीच्या अभ्यासक्रमात असलेला भाग वगळून त्या जागी केवळ अनुवांशिकता एवढाच भाग ठेवलेला आहे. अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याच्या महाराष्ट्र अंनिस निषेध करीत आहे आणि आपला निषेध कृतीतून व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र अंनिस चला उत्क्रांती समजून घेवूया हे अभियान राबविणार आहे अशी माहिती महाराष्ट्र अंनिस मार्फत डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, फारुक गवंडी, सुजाता म्हेत्रे, डॉ. संजय निटवे, वाघेश साळुंखे, डॉ. एस.के. माने, सुनील भिंगे, रवी सांगोलकर, सचिन करगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात असे नमूद केले आहे की, पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पत्ती कशी झाली याची शास्त्रीय मांडणी उत्क्रांतीच्या सिद्धांताद्वारे केली जाते. टप्प्याटप्प्याने एकपेशीय प्राणी त्यानंतर बहुपेशीय प्राणी, मानवाच्या आधीच्या टप्प्या वरील माकड आणि सर्वात शेवटी मानव अशा टप्प्यांच्या मधून मानवी उत्क्रांती कशी झाली यांची शास्त्रीय माहिती या मध्ये दिली जाते. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्याच्या मागे कोणतीही विशिष्ट शक्ती नसून उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून ती झाली आहे ही माहिती शालेय वयातील मुलांना पहिल्यांदा उत्क्रांतीच्या सिद्धांतातून होते. मानवी जीवनाच्या वर प्रभाव टाकणार्या अनेक अंधश्रद्धाची निर्मिती ही मानवी जीवनाचा उगम कसा झाला यांची योग्य माहिती नसल्याने होते. त्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय अभ्यासक्रमातून शिकविल्याने विद्यार्थ्यांची मानवी जीवनाच्या उत्पत्ती मागे असलेल्या विज्ञानवादी भूमिकेशी तोंड ओळख होते. प्रत्यक्षात सहावी, सातवीच्या विद्यार्थ्याला या विषयी प्रश्न पडू लागतात. त्यामुळे तेव्हा पासून टप्प्याटप्प्याने ह्या विषयी माहिती शालेय अभ्यास -क्रमातून येणे आवश्यक आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय पुस्तकांच्या मधून वगळल्यामुळे मुलांच्या मध्ये विज्ञानवादी मानसिकता निर्माण होण्यात अडथळा निर्माण होणार आहे असे देखील या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. यामध्ये पुढे सांगितले आहे की, भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांच्या मध्ये हा उत्क्रांती सिद्धांत जीवशास्त्रातील मूलभूत सिद्धांत म्हणून शिकवला जातो. उत्क्रांती या विषयी विशेष कोर्स देखील शिकवले जातात. अशा पार्श्वभूमीवर उत्क्रांतीचा सिद्धांत हा दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळल्या मुळे जे विद्यार्थी दहावी नंतर विज्ञान शाखा घेणार नाहीत त्यांना उत्क्रांतीच्या सिद्धांताची माहिती मिळणार नाही. देशभरातील अठराशे वैज्ञानिकांनी या गोष्टीला विरोध नोंदविला आहे. त्याला महाराष्ट्र अंनिस पाठिंबा देत आहे असे देखील या पत्रात नमूद केले आहे.