| पालघर | प्रतिनिधी |
वसई तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच नालासोपाऱ्यातील तुळींज परिसरातील साईबाबा नगर येथे गुरुवारी (दि.9) मोठी दुर्घटना घडली. डोंगराच्या उतारावरून वेगाने आलेल्या पाण्याचा प्रवाहमुळे चाळीतील चार घरे अचानक कोसळली. काही क्षणातच घरांच्या भिंती जमीनदोस्त झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने ही घटना घडत असताना रहिवासी वेळेत बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील संसारोपयोगी वस्तू, फर्निचर, कपडे, धान्य तसेच इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नालासोपारा आणि वसई परिसरातील अनेक भाग धोक्याच्या छायेत आले असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अशा धोकादायक भागांचे सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नालासोपाऱ्यात चार घरे कोसळली

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606