दिलीप भोईरसह चौघांची रवानगी कारागृहात

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मारहाणीबरोबरच घातक शस्त्राने हल्ला करणाऱ्या 21 जणांपैकी चौघेजण अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर अखेर पाच दिवसांनी दिलीप भोईर यांच्यासह चौघांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

चोंढी नाक्यावर 11 सप्टेंबर 2012 रोजी कॉम्प्युटर क्लासमध्ये घुसून रुपाली थळे यांच्यासह अनेकांना मारहाण करण्यात आली. घातक शस्त्राने मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटातील दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांच्यासह 25 पैकी 21 जणांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी (दि.30) सुनावली होती.

शिक्षा सुनावलेल्या 21 पैकी 17 आरोपींना तळोजा कारागृहात 30 ऑक्टोबरला रात्री पाठविण्यात आले होते. उर्वरित चार आरोपींची प्रकृती बिघडल्याने त्यांना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, गणेश म्हात्रे, जयवंत साळुंखे, अशोक थळे यांचा समावेश होता. गेल्या अनेक दिवसांपासून या चौघांवर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले होते. अखेर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे लक्षात आल्यावर चौघांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. दिलीप भोईर, गणेश म्हात्रे, अशोक थळे यांना शुक्रवारी सकाळी आणि जयवंत साळुंखे यांना बुधवारी कारागृहात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version