17 आरोपींची तळोजात रवानगी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मारहाणीबरोबरच घातक शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी 21 जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. यातील 17 जणांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली असून, चार जणांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दिलीप भोईर यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
चोंढी नाक्यावर 11 सप्टेंबर 2012 रोजी कॉम्प्युटर क्लासमध्ये घुसून रुपाली थळे यांच्यासह अनेकांना मारहाण करण्यात आली. घातक शस्त्राने मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांच्यासह 21 जणांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी (दि.30) सुनावली. एकूण 25 आरोपींपैकी चार आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्तता झालेल्यापैकी एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शिक्षा सुनावलेल्या 21 पैकी 17 आरोपींना तळोजा कारागृहात पाठविण्यात आले आहेत. उर्वरित चार आरोपींची प्रकृती बिघडल्याने त्यांना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, गणेश म्हात्रे, जयवंत साळुंखे, अशोक थळे यांचा समावेश आहे. त्यांच्या आजारपणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.





