। पोलादपूर । वार्ताहर ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa Express) कशेडी घाटातील चोळई गावातील अपघातांची मालिका चौपदरीकरणानंतरही अद्याप थांबलेली दिसून येत नाही. सोमवारी दुपारी प्रोकलेन घेऊन जाणार्या ट्रेलरची डंपरला धडक बसल्याने झालेल्या अपघातामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.
सोमवार दि. 18 जुलै रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास खेडकडून मुंबईच्या दिशेने ट्रेलरमधून प्रोकलँण्ड मशीन घेऊन तीव्र वळण उतारावरून वेगाने येत असताना चालकाचा ताबा सुटून ट्रेलर आणि प्रोकलँड मशीनसह पोलादपूरकडून धामणदिवीच्या दिशेने जाणार्या डम्परला समोरासमोर रस्त्याच्या मधोमध धडक बसली. यामुळे डम्पर आणि ट्रेलर ही दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाली.
यावेळी ट्रेलरमधील हिरालाल राधाकिशन चौधरी (वय 16 वर्षे) आणि प्रधान रामकिशन चौधरी (वय 23 वर्षे), दोघेही रा.समोद, ता.नसेराबाद, जि.अजमेर, राजस्थान तसेच डम्परमधील शंकर काशिनाथ पवार (वय 40 वर्षे, जोगेश्वरी गाडीतळ, पोलादपूर) आणि तुषार नीळकंठ सावंत (वय 36 वर्षे, सह्याद्रीनगर, पोलादपूर) असे चौघेजण जखमी झाले. यावेळी अजय सलागरे तसेच अन्य प्रवाशांनी घटनास्थळावरून जखमींना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी ट्रेलरचा चालक प्रधान रामकिशन चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक फौजदार व्हि.जी.चव्हाण हे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.