सौदी रियालच्या नावे चार लाखांचा गंडा

| पनवेल | वार्ताहर |

सौदी 50 रियालच्या 200 नोटा देतो, असे सांगून चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शब्बीर, अनोळखी महिला आणि सद्दाम यांच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इम्तियाज अन्सारी हे सेक्टर 17, उलवे येथे राहत असून कळंबोली येथे राहणाऱ्या शब्बीर याने अन्सारी यांच्या नातेवाईकांना सौदी बँकेच्या नोटा असल्याचे सांगितले आणि त्या नोटा भारतीय चलनात परिवर्तन केल्यास एक रियाल चलनामागे भारतीय चलनाचा पाच रुपये फायदा होईल, अशा 50 रियाल नोटांच्या एकूण 200 नोटांच्या बदल्यात पन्नास हजार रुपयांचा फायदा होईल असे सांगितले. शब्बीर याने 50 रियालची नोट दाखवली. नोट एक्सचेंज करून एक हजार रुपये देखील घेतले. त्यानंतर शब्बीर एका महिलेच्या घरी जाऊन पिशवी घेऊन आला आणि नोटा दाखवल्या. अन्सारी याने चार लाख रुपये शब्बीर याच्या सोबतच्या महिलेला दिले आणि त्यांनी रियाल चलन असलेली पिशवी दिली आणि ते तेथून निघून गेले. अन्सारी यांनी पिशवी उघडून पाहिली असता त्यात न्यूजपेपर रोल करून ठेवलेले आणि 50 रियालच्या तीन नोटा मिळून आल्या.

Exit mobile version