। अकोला । प्रतिनिधी ।
समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील वनोजा आणि कारंजा दरम्यान भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि. 03) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील जयस्वाल कुटुंबीय पुण्यात एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते नागपूर (उमरेड)कडे परत येत होते. दरम्यान, वाशीम परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार महामार्गावरील दुभाजकावर आदळली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर वाशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील बचाव पथक आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. एकाच कटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.