गुजरात, बिहारमध्ये स्वबळावर लढणार
| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
आम आदमी पक्ष (आप) विरोधकांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडला असून, पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज तशी घोषणा केली. काँग्रेस पक्ष हा गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपला मदत करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मागील खेपेस केवळ लोकसभेच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्ष हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्यानिमित्ताने एकत्र आले होते, असेही केजरीवाल यांनी नमूद केले. केजरीवाल म्हणाले की, गुजरात विधानसभेची 2027 मधील निवडणूक पक्ष स्वबळावर लढेल आणि विजयी देखील होईल.
बिहारमध्येही आमची ताकद आजमावू. राज्याला आता भाजप आणि काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त एक नवा पर्याय मिळाला. काँग्रेससोबतची आघाडी तोडली असून, त्यांना आघाडीच करायची होती, तर त्यांनी विश्वदारची पोटनिवडणूक लढण्याचे कारण काय होते? येथे आमच्या पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजपनेच काँग्रेसला पाठविले होते. येथील पोटनिवडणुकीत आपचे उमेदवार गोपाल इटालिया हे विजयी झाले होते. भाजपच्या किरीट पटेल यांचा त्यांनी सतरा हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. केजरीवाल यांनी यावेळी गुजरात जोडो मोहिमेची घोषणाही केली. केवळ दूरध्वनीवरून मिस कॉल करून लोकांना आपचे सदस्य होता येईल. भ्रष्टाचारमुक्त गुजरातसाठी आमचे कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरी जातील असे त्यांनी नमूद केले. सध्या गुजरातमध्ये आपचे पाच आमदार आहेत.