| पनवेल | प्रतिनिधी |
बोलण्यात गुंतवून पाच लाख रुपयांची निळ्या रंगाची सॅक जबरदस्तीने खेचून चौघेजण इटिंगा कारमधून पळून गेले. याप्रकरणी रमेश पटेल आणि चार अनोळखी इसमांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तौहिद खान हा नालासोपारा येथे राहात असून, त्याला एजंट अमोल याचा फोन आला आणि प्लॉट खरेदी करायचा आहे का? असे विचारले. मामा अब्दुल कादर यांना प्लॉट पसंत पडला तर खरेदी करण्यास तयार होईन, असे खान याने सांगितले. अमोलने फोन करून कॉन्फरन्सवर जयेश या त्रयस्थ इसमासोबत खानचे बोलणे करून दिले. यावेळी पनवेलमध्ये जागा दाखवतो, यासाठी पाच लाख रुपये घेऊन या, असे सांगितले. त्यानुसार पनवेल स्टेशन येथे येण्यास सांगितले. खान पनवेल स्टेशन येथे गेले असता त्यावेळी जयेशला फोन केला असता रमेश हा इसम तुम्हाला न्यायला, येईल असे सांगितले. यावेळी एक इसम त्यांच्या जवळ आला व त्याने रमेश पटेल असे त्याचे नाव सांगितले. काही वेळात अब्दुल कादर हे पैसे घेऊन आले. यावेळी ते तिघेजण जागा बघण्यासाठी पुढे चालत गेले. यावेळी पाठीमागून एक इटिंगा कार आली आणि त्यातील इसमांनी काठी दाखवून मारण्याची धमकी देत पैशांची बॅग घेऊन पळ काढला.






