महिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
| अलिबाग | प्रतिनिधी |
पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या साफसफाईचे काम पूर्ण केले नाही. याबाबत विचारणा केल्याचा राग धरून महिलांसह चौघांनी कंपनीत गोंधळ घातला. शिवीगाळी करून विनयभंगाची तक्रार करणार असल्याची धमकी कंपनीतील अधिकाऱ्याला देण्यात आली. कंपनीत घुसून गोंधळ घालणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या तसेच चिथावणी करणाऱ्या पाच जणांविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी कंपनीतील इस्टेट ऑफिसमध्ये घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश धनावडे असे तक्रारदार यांचे नाव आहे. तक्रारदार हे रिलायन्स कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. कंपनी हद्दीतील झोतीरपाडाकडे जाणाऱ्या नाल्यामधून पावसाळ्यापूर्वी गाळ व घाण मागील वर्षी 2025 मध्ये काढायचा होता. हे काम झोतीरपाडा येथील प्रमोद तरे यांना दिले होते. कार्याध्यादेश असतानाही पावसाळ्यापूर्वी आणि नंतरही त्यांनी काम पूर्ण केले नाही. त्यामुळे कंपनीतील पी अँड सी विभागाने मागील महिन्यात बोलावून तरे यांना काम पूर्ण करण्यास सांगितले. तरीदेखील त्यांनी काम पूर्ण केले नाही. कंपनी व्यवस्थापनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. अखेर गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या संपर्क साधून इस्टेट ऑफिसमध्ये त्यांना एकट्याला भेटण्यास बोलावले होते. परंतु, ते आले नाही. मात्र, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास इस्टेट ऑफिसमध्ये काम करीत असताना तीन महिलांनी अनधिकृतपणे कार्यालयामध्ये प्रवेश केला. धनावडे यांच्या केबीनमध्ये घुसून आरडाओरडीसह शिवीगाळी करू लागले. त्यानंतर धनावडे यांच्या अंगावर त्या महिला धावून येत होत्या. तसेच ठार मारण्याबरोबरच विनयभंगाची तक्रार करणार असल्याची धमकी त्यांना देत होत्या. त्याचवेळी राजेंद्र तरे यांनीदेखील येऊन शिवीगाळी आणि दमदाटी केली. प्रमोद तरे मोबाईलवर संपर्क साधून चिथावणी करीत होते.
अनधिकृतपणे कार्यालयात घुसून दमदाटी शिवीगाळी करणे, गोंधळ घालणे, विनयभंग करणार असल्याची तक्रार दाखल करण्याची धमकी देणे याप्रकरणी प्रमोद तरे, राजेंद्र तरे, वरुणा तरे, रंजना तरे, सरिता तरे यांच्याविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात धनावडे यांनी तक्रार केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
