| पनवेल | प्रतिनिधी |
गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेलकडून 4 अट्टल आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याकडून 9 गुन्हे उघडकीस आणण्यात देखील पोलिसांना यश आले आहे.
पनवेल जवळील ए-टॅक इंटरप्रायझेस कंपनीच्या उरण ते गव्हाणफाटा या रस्त्यावर असलेल्या रेल्वे ब्रिजच्या बांधकाम साईटवर चार अनोळखी चोरट्यांनी येथील वॉचमनचे हात रस्सीने बांधुन त्यास मारहाण केली होती. तसेच, त्या ठिकाणावरुन रेल्वे ब्रिज बनविण्याचे लोखंडी साहित्य व सामानाची चोरी केली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेल यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले. त्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे बेलापुर येथुन आरोपी समशेर शेर खान (21) व कुलदिप बच्चु सिंग (23) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच, पनवेल शहर, कामोठे तसेच उलवा पोलीस ठाणे हद्दीतुन बिल्डींग बांधकामाकरीता वापरण्यात येणारे स्टिल व इतर साहित्य चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.
त्यानंतर कळंबोली येथील गुरूनाथ नरशेट्टी (64) यांच्या घरात झालेल्या चोरीचा देखील उलगडा झाला आहे. नगरशेट्टी पतीपत्नी बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरात चोरी झाली होती. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. विशेष पथकाने तांत्रिक तपासाद्वारे या गुन्ह्यातील आरोपी सलिम मोहम्मद शेख (37) व तौफिक मोहम्मद शेख (32) यांना अंबरनाथ येथुन ताब्यात घेतले. या दोन आरोपींची कसून चौकशी केली असता घरफोडीचा गुन्हा उघडकीस आले आहेत. यासह पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 4 गुन्हे व कामोठे 1 व उलवा येथील 1 गुन्हे उघडकीस करण्यात पोलिसांना यश आले आहे.
चार अट्टल चोरांना अटक
