पनवेल रेल्वे स्थानकात चार पिस्तुले जप्त; आरोपी अटकेत

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल रेल्वे स्टेशन येथे बेकायदेशिररित्या पिस्तुलांची विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली आहे. सदर अटक आरोपीकडुन 3 लाख 47 हजार 100 रूपये किंमतीची एकूण 4 पिस्तुले व चार जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आलेली आहेत. ही धडक कारवाई गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल यांच्याकडून करण्यात आली आहे.

एक इसम पनवेल रेल्वे स्टेशन परीसरात बेकायदेशिररित्या पिस्तुलांची विक्री करण्यासाठी येणार असल्याबाबत गोपनिय बातमीदाराकडुन गुन्हे शाखा, कक्ष 2 यांना माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पडताळणी करून कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखा कक्ष 2, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची दोन पथके तयार करून पनवेल रेल्वे स्टेशन परीसरात सापळा रचण्यात आला होता. गोपाल राजपाल भारद्वाज (वय 22) याला पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकांनी शिताफीने ताब्यात घेतले.

त्यानंतर अटक आरोपीकडे असलेल्या बॅग (सॅक)ची तपासणी केली असता त्यामध्ये देशी बनावटीचे 04 पिस्तुल व 04 जिवंत काडतुसे सापडली. सदर आरोपिंविरुध्द पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढिल तपास गुन्हे शाखा कक्ष 2, पनवेल हे करीत आहेत. या गुन्ह्यातील अटक आरोपी गोपाल राजपाल भारव्दाज हा उत्तरप्रदेश राज्यातील रा. नवोदय नगर, टेहरी विस्थापीत कॉलनी, साई मंदिर पार्कच्या जवळ राहणारा असून त्याला गुन्हे शाखा कक्ष 2 ने शिताफीने ताब्यात घेतले आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप गायकवाड, सपोनि फडतरे, पोउपनि, पाटील, पोउनि वैभव रोंगे यांच्यासह पथकाने केली आहे.

Exit mobile version