अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
। जयपूर । वृत्तसंस्था ।
राजस्थानमध्ये एका शाळेचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, सुमारे 40 विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती आहे. अपघाताच्या वेळी शाळेत सुमारे 60 ते 70 मुले उपस्थित होती. आतापर्यंत 32 मुलांना ढिगाऱ्यातून वाचवण्यात आले असून गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना झालावाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजस्थानातील झालावाडमध्ये मनोहर पोलीस स्टेशन हद्दीतील पिपलोदी येथील शासकीय उच्च प्राथमिक विद्यालयात ही घटना घडली. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक आणि प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. दुर्घटनेत 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. जखमींपैकी 10 जणांना झालावाडला हलवण्यात आले आहे. या 10 पैकी तीन ते चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जेसीबीच्या मदतीने ढिगारा काढून मुलांना बाहेर काढण्यात येत आहे.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. शाळांच्या सुरक्षिततेसाठी कठोर नियम आणि उपाययोजना लागू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, राज्यातील इतर शाळांच्या इमारतींची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धोकादायक इमारती तात्काळ दुरुस्त करण्याचे किंवा रिकाम्या करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच, जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार आहे.







