विधानपरिषदेसाठी चार बिनविरोध; दोन ठिकाणी लढत

। नागपूर । वृत्तसंस्था ।
राज्याच सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मूदत होती, त्यामुळे सकाळपासूनच जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत होत्या. अखेर तीन वाजपेर्यंत राजकीय तडजोडींमधून राज्यातील सहा पैकी चार जागा बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाला, त्यानुसार विरोधी अर्ज मागेही घेतल्या गेले. मात्र दोन जागांचा तिढा न सुटल्याने या ठिकणी निवडणूक होत आहे. राज्यातील सहा पैकी बिनविरोध झालेल्या चार जागांमध्ये मुंबईतील दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारच्या प्रत्येकी एक जागेचा समावेश आहे. तर, नागपूर आणि अकोला-वाशीम-बुलडाणा येथील जागेवर लढत होणार आहे. नागपूरमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस, तर अकोला-वाशीम-बुलडाणा येथे शिवसेना विरुद्ध भाजपा लढत होत आहे. कोल्हापूरमध्ये भाजपा उमेदवार अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला आहे. धुळ्यामध्ये भाजपाचे अमरिश पटेल हे बिनविरोध होत आहेत. याशिवाय, मुंबईमधील बिनविरोध झालेल्या दोन जागांवर भाजापाचे राजहंस सिंग आणि शिवसेनेचे सुनील शिंदे यांची वर्णी लागलेली आहे. तर, नागपूरमध्ये भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर हे आमनेसामाने आहेत. अकोला-वाशीम-बुलढाणा मतदारसंघात भाजपाकडून वसंत खंडलवाल आणि महाविकासआघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजेरिया हे निवडणूक रिंगणात आहेत.

Exit mobile version