चारचाकी वाहन चोरट्यास अटक

 | पनवेल | प्रतिनिधी |

17 गुन्हे दाखल असलेल्या सराईत चारचाकी वाहन चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी नाट्यमयरित्या आळंदी येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याअटकेमुळे पनवेलसह पुणे परिसरातील एकूण वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

किशन शिवराम मलगी यांनी त्यांच्या मालकीची होंडा सिटी कार (एमएच-46 एपी-3070)  ही  पनवेल कोळखे गाव येथील एसबी गॅरेज समोर  बंद करुन ठेवली असता ती कोणीतरी चोरुन नेत्याची तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस  पथकाने घटनास्थळी भेट देवुन तेथील सी.सी.टी.व्ही. कॅमेराची पाहणी केली असता, आरोपीने गुन्हयातील वाहन चोरी करण्यासाठी वापरलेली एक्स.यु.व्ही. मोटार कार घटनास्थळाशेजारी उभी केल्याचे दिसून आले. या गाडीबाबत अधिक माहिती काढली असता गुन्हयात वापरलेली एक्स.यु.व्ही. मोटार कार हि खांदेश्‍वर पोलीस ठाणेच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने अशा प्रकारचे गुन्हयाची कार्यपद्धती असणारे माहितीची सांगड घालून सदर चोरी आरोपी रेवन सोनटक्के (वय 22, रा. पुंणे) याने केला असल्याचा संशय पोलिसांच्या पथकास आला. त्यानुसार पोलिसांनी त्याची माहिती काढल्यास सुरुवात केली मात्र तो वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांना आव्हानात्मक झाले होते.

तपासादरम्यान आरोपी हा आळंदी येथे येणार असल्याची बातमी मिळताच सदर पथकाने तात्काळ व शिताफीने कारवाई करून केळगाव, आळंदी येथे स्थानिक पोलीसांच्या मदतीने सापळा रचुन आरोपी रेवन सोनटक्के हा घरात झोपला असताना त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानेच गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच आणखी 16 असे एकूण 17 गुन्ह्यांबद्दल माहिती दिली. त्याला न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने 2 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version