धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी चार तरूणांनी केले विष प्राशन

| सोलापूर | प्रतिनिधी |
मराठा आरक्षण आंदोलनाची धग सोलापूर जिल्ह्यात वाढत असताना बार्शी तालुक्यातील देवगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चौघाजणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे माळी समाजाच्या कार्यकर्त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्यामागील कारण मराठा आरक्षणाची मागणी असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

बार्शी तालुक्यात देवगाव येथे तणनाशक प्राशन केलेल्या रणजित ऋषिनाथ मांजरे (वय 29), प्रशांत मोहन मांजरे (वय 28), योगेश भारत मांजरे (वय 40) आणि दीपक सुरेश पाटील (वय 26) अशी चौघांची नावे आहेत. हे चौघेही मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होते.

रात्री रणजित मांजरे याने तणनाशक प्राशन केल्यानंतर प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे त्यास बार्शीतील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रशांत मांजरे, दीपक पाटील व योगेश मांजरे हे रूग्णालयात गेले होते. त्यांनीही मराठा आरक्षण आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे उद्विग्न होऊन रूग्णालयाच्या आवारातच विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे तेथे गोंधळ उडाला. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय राहिलेल्या विलास कृष्णा क्षीरसागर (वय 24) या माळी समाजाच्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विलास क्षीरसागर हा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होता. काल झालेल्या आंदोलनातही त्याचा सहभाग होता.

उद्विग्न होऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत विलास हा मूळचा ओझेवाडी (ता. पंढरपूर) येथील राहणारा होता. तो गेली 18 वर्षे तारापूर येथे संतोष शेळके यांच्या शेतात काम करायचा. तो गावातील प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हायचा. यापूर्वी 2016 साली झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात तो सहभागी झाला होता.

Exit mobile version