| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईमध्ये 14 माओवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगडच्या सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन ठिकाणी वेगवेगळी कारवाई केली. या दोन्ही ठिकाणच्या कारवाईत एकूण 14 माओवादी ठार झाले आहेत.
सुरक्षा दलांकडून अद्यापही शोधमोहीम सुरू असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये आठ लाख रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी कमांडर मंगडू याचाही समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुकमा जिल्ह्याच्या दक्षिणेकडील एका जंगलात सुरक्षा दलांचं एक संयुक्त पथक ही कारवाई करत होतं. पहाटेपासून गोळीबार सुरू झाला होता आणि तो अधूनमधून सुरूच होता. या कारवाईनंतर घटनास्थळावरून अनेक मृतदेह सापडले आहेत. तसेच हे ऑपरेशन अद्याप संपलेलं नसून, पुढील कारवाई अद्यापही सुरू असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.






