साडेतीन वर्षांत चौथे नगराध्यक्ष
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायतीत गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत राजकीय उलथापालथींचा सिलसिला सुरूच असून, नुकत्याच पार पडलेल्या निवडीत चौथ्या नगराध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. या सततच्या बदलांमुळे प्रशासनात अस्थिरता निर्माण झाली असून, विकासकामांवर त्याचा प्रत्यक्ष परिणाम जाणवू लागला आहे.
नगराध्यक्षपदावर वारंवार होणारे बदल, काही नगरसेवक व नगराध्यक्षांचे सदस्यत्व रद्द होणे, पहिल्या नगराध्यक्षांचा राजीनामा, तसेच नगरसेवक पदासाठी झालेल्या पोटनिवडणुका या सर्व घडामोडींनी पाली नगरपंचायतीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या राजकीय अस्थिरतेमुळे अनेक महत्त्वाची विकासकामे रखडली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी योजनांना गती मिळण्याऐवजी अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनात सातत्याचा अभाव असल्यामुळे निर्णयप्रक्रिया आणि निधी वितरणात विलंब होत आहे.
पाली नगरपंचायतीत सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू असलेली रस्सीखेच जनतेच्या अपेक्षांशी विसंगत ठरत असून, लोकप्रतिनिधींनी विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. सध्या निवडून आलेल्या नगराध्यक्षांकडून जनतेला अपेक्षा आहे की, त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून पालीच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत.







