अमेरिकन डॉलरचे आमिष दाखवून फसवणूक

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

अमेरिकन चलन असणारे डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणारी टोळी नवी मुंबई पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांना अटक केल्या नंतरच्या चौकशीत अन्य दोन असे एकूण तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सर्व संशयित आरोपी हे झाडखंड राज्यातील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वस्तात अमेरिकेचे डॉलर देण्याचे आमिष दाखवून तीन लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी 23 ऑक्टोबरला नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कांदिवली येथे राहणाऱ्या मोहम्मद आफ्रिदी सिद्दीकी या (33) व्यक्तीची फसवणूक झाली होती. त्याच्या संपर्कात संशयित आरोपी आले असता त्यांनी अमेरिरिकेचे चलन असणारे डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले होते. त्याला बळी पडून सिद्दीकी यांनी 3 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. भारतीय चलन घेत डॉलर देण्यासाठी संशयित आरोपींनी ऐरोली येथे भेटण्याचे ठरवले होते. त्यानुसार संशयित आरोपी आणि तक्रारदार 20 तारखेला भेटले.

तीन लाख रुपये घेत डॉलरचे पुडके सिद्दीकी याला देत आरोपींनी घाई असल्याचे दाखवत पळ काढला . सिद्दीकी यांनी कागदात गुंडाळलेले पुडके पहिले असता ते नोटांच्या आकारात कापण्यात आलेले कागद असल्याचे समोर आले. त्यांनी या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. असे प्रकार वाढत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी एक पथक स्थापन केले. या तपास पथकाने घटनास्थळाचे पुन्हा बारकाईने निरीक्षण केले तसेच सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषण करीत तपास पुढे नेला. या शिवाय पारंपरिक पद्धतीने प्रत्यक्षदर्शी आणि खबरी यांची मदत घेतली . या तपासाला यश आले आणि संशयित आरोपी हे शिळफाटा मुंब्रा ठाणे परिसरात असल्याचे समोर आले. तपास पथकाने तात्काळ सापळा रचून चारही आरोपींना जेरबंद केले. चौकशीत त्यांची नावे हे मोहमद राहुल लुकमान शेख उर्फ रफीक (35) आलमगीर आलम सुखखू शेख, (27), खोसमुद्दीन मोहम्मद शेख उर्फ येलीम, (23), रिंकु अबुताहीर शेख, (26), रोहीम बकसर शेख (34),अजीजुर रहमान सादिक शेख, (37) असे आहेत सर्व आरोपी झाडखंड येथील असून, सध्या सर्व जण मटका चाळ, कौसा, मुंब्रा येथे राहात होते. या सर्वांना अटक करण्यात आलेली आहे.

Exit mobile version