| नवी मुंबई | प्रतिनिधी |
तंत्रमंत्राचा वापर करून पैसे दुप्पट करण्याचे प्रलोभन दाखवत एका साधूने मिरा रोड येथील वकिलाला 20 लाखांचा गंडा घातल्याची घटना सीबीडीत घडली आहे. प्रेमसिंग साधू (40) असे त्याचे नाव असून, सीबीडी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. फसवणुकीत घरमालक अनंत नरहरी (65) यांचाही सहभाग असल्याचे तपासात आढळल्याने पोलिसांनी त्यालाही सहआरोपी केले आहे. ध
मिळालेल्या माहितीनुसार, धरमवीर त्रिपाठी (42) हे मिरा रोड येथे राहण्यास असून, व्यवसायाने वकील आहेत. वर्षभरापूर्वी ते काशी येथे दर्शनासाठी गेले असताना, पुष्पेंद्र तिवारी नावाच्या साधूशी त्यांची ओळख झाली होती. त्रिपाठी हे तिवारी यांच्याशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्कात होते. दरम्यान, तिवारी यांनी प्रेमसिंग नावाच्या साधूशी त्रिपाठी यांची भेट घालून दिली. तंत्रमंत्र व पैसे दुप्पट करण्याचे प्रलोभन दाखवून प्रेमसिंगने त्रिपाठी यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्याने सीबीडी बेलापूर सेक्टर 8 बी मधील गोमती सोसायटीतील अनंत नरहरी यांच्या फ्लॅटमध्ये पूजाविधी करून पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि.22) त्रिपाठी पत्नी व मुलगा यांच्यासह 20 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग घेऊन सीबीडीतील फ्लॅटवर गेले होते.
प्रेमसिंग याने हॉलमध्ये पूजेसाठी साहित्य मांडून लक्ष्मी- गणपतीच्या फोटोसमोर 20 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग ठेवून तंत्रमंत्र जप सुरू असल्याचे भासवले. दरम्यान, त्याने त्रिपाठी व त्याच्या कुटुंबाला तसेच फ्लॅटमालक व त्याची पत्नी या सर्वांना आतल्या खोलीत थांबण्यास सांगून त्यांना लक्ष्मीदेवाय नम: या मंत्राचा जप करण्यास तसेच अंथरलेल्या पांढऱ्या कापडावर एक लवंग टाकण्यास सांगितले. 10 ते 15 मिनिटांत पैसे दुप्पट होतील, असे सांगून खोली आतून बंद करण्यास सांगितली. त्यानंतर फ्लॅटचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद करून 20 लाखांची रोख रक्कम असलेली बॅग घेऊन पोबारा केला. दीड तास झाल्यानंतर धरमवीर त्रिपाठी यांनी रात्री आठच्या सुमारास खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता, प्रेमसिंग साधू रोख रकमेची बॅग घेऊन पळल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर त्रिपाठी यांनी तत्काळ सीबीडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी प्रेमसिंग व फ्लॅटमालक अनंत नरहरी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.







