आयुर्वेदिक औषधांची विक्री करून फसवणूक

संशयिताला गुहागरमध्ये अटक

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

अर्धांगवायू आजारावर आयुर्वेदिक औषध विकण्यासाठी गुहागर तालुक्यात फिरणार्‍या संशयिताला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे. चंद्रकांत पांडुरंग वायकर, माळशिरस (जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

गुहागर तालुक्यात अर्धांगवायू आजारावर औषध विकणारी एक व्यक्ती गेले तीन दिवस गाडी घेऊन गाव वाडीवार फिरत आहे. तसेच, काही गावांमध्ये त्याने या औषधावर बरेच पैसे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अनेकांनी हे औषध खरेदी करुन स्वतःची फसवणूकही केली होती. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांना याची माहिती मिळताच संबंधित वाहन फिरताना दिसल्याच गुहागर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी केले होते. याबाबत माहिती मिळताच संशयित चंद्रकांत पांडुरंग वायकर याला गुहागर येथे गाडीसह ताब्यात घेण्यात आले आहे.

येथील एका व्यक्तीने सांगीतले की, संशयित वायकर हा आपल्या घरी येऊन त्याने पॅरालिसीसचे बरेच रुग्ण बरे केल्याचे सांगून आपल्या वडिलांचा पॅरालिसीसी आजार पूर्णपणे बरा करतो, असे खोटी बतावणी करुन औषध घेण्यास भाग पाडले होते. तसेच, एकूण 3 लोकांची 19 हजार 300 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करून गाडीसह गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version