जमीन हडप करणार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

महाडमधील तीन बड्या व्यावसायिकांचा समावेश
। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करत बनावट अखत्यारपत्र बनवून त्याद्वारे जमीन हडप करणार्‍या महाड शहरातील तीन बड्या व्यावसायिकांविरोधात फसवणूक व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नवेनगर येथे राहणारे चंद्रकांत मोरे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली आहे. चंद्रकांत मोरे हे अनुसूचित जातीमधील बुरुड समाजातील असून, ते बाहेरगावी नोकरीत असल्याचा फायदा घेत 25 जून 1992 मध्ये मनजी भानजी पटेल यांनी मोरे यांची संमती नसतानादेखील बनावट अखत्यारपत्र तयार केले व त्याआधारे मनजी पटेल, विश्राम पटेल व सचिन कांतीलाल गुजर या तिघांनी संगनमत करून 2012 मध्ये या जमिनीचे खरेदीखतदेखील केले व महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली चंद्रकांत मोरे यांची सर्वे नंबर 111/1 व 111/2 मधील जमीन हडप करण्याचा प्रयत्न करून या जमिनीवर या ठिकाणी आपला मालकी हक्क सांगितला.

चंद्रकांत मोरे हे अनुसूचित जातीचे असल्याचे माहीत असूनही या तिघांनी चंद्रकांत मोरे यांच्यावर जातीय अन्याय करत त्यांना जमीन हक्कापासून वंचित ठेवले, या कारणास्तव मोरे यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. 25 जून 1992 पासून 24 मे 2022 पर्यंत हा गैरव्यवहाराचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 24 मे रोजी या तिघांवर फसवणुकीबरोबरच अ‍ॅट्रॉसिटीचादेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपअधीक्षक निलेश तांबे हे करीत आहेत.

Exit mobile version