दिव्यांग निधी वाटपात अफरातफर; लाभार्थीला दिला मुदतबाह्य धनादेश

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजना राबवित असले तरी प्रत्यक्षात त्या निधीचा लाभ मिळवण्यासाठी दिव्यांग बांधव व त्याच्या कुटुंबियांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. दिव्यांग लाभार्थीला लाभाचा मुदतबाह्य धनादेश दिल्याने कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. नम्रता मोरे यांनी एकूणच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तक्रारी निवेदनाद्वारे केली आहे.
रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका अलका बामुगडे या वरिष्ठांच्या आदेशाला जुमानत नसुन त्यांच्यावर चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी पीडित दिव्यांग भगिनी निशा मोरे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. यासंदर्भात दिव्यांग भगिनीच्या नातेवाईक नम्रता मोरे यांनी माझ्या नणंद निशा मोरे या 65 टक्के दिव्यांग असून त्यांना ग्रामपंचायतीकडून मिळणार्‍या 3 टक्के अपंग निधीमध्ये अफरातफर होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबद्दल रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका अलका बामुगडे यांच्याकडे आपल्या नणंद निशा मोरे यांच्या दिव्यांग निधीचा विनियोगाची माहिती मागितली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे मी रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना भेटले आणि ग्रामपंचायतीकडून मला दिव्यांग निधीची माहिती देत नसल्याची तक्रार केली. त्यामुळे ग्रामसेविका अलका बामुगडे यांना तत्काळ माहिती देण्याचे आदेश देण्यात आले. परंतू अलका बामुगडे यांनी मला माहिती देण्याऐवजी अडीच लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. सदर प्रकरणाचा पाठपुरावा करू नका असे मला सांगण्यात आले. असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान नम्रता मोरे यांच्या 3 टक्के अपंग निधी बाबत केलेल्या तक्रारीची दखल घेऊन तक्रारीच्या अनुषंगाने सत्यता पडताळणी करून 3 टक्के अपंग निधी बाबत योग्य ती नियोमीचीत कार्यवाही करण्याच्या सूचना गिरीश भालेराव, उपायुक्त कोकण विभाग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांना दिलेल्या आहेत. तरी मुख्य कार्यकारी अधिकारी पुढे काय कारवाई करणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

दिव्यांग बांधवांना दरवर्षी रक्कम समान येत नाही, जशी वसुली होते, त्यानुसार निधी वाटप केला जातो, यामध्ये 50 टक्के सार्वजनिक व 50 टक्के वैयक्तिक लाभ दिला जातो, आमच्या ग्रामपंचायतीत एकूण चार दिव्यांग लाभार्थी आहेत, या सर्वांचे 36 हजार रुपये देणे बाकी आहे. मुदातबाह्य धनादेश दिले यावर बोलताना सांगितले की, खात्यात रक्कम नसल्याने चेक वटवता आले नाहीत, आम्ही सुधारित 75 हजार रुपयांचा धनादेश निशा मोरे यांना दिलेला आहे, शिल्लक रक्कम 36 हजार देणे बाकी आहे.
अलका बामगुडे, ग्रामसेविका

तक्रारदार नम्रता मोरे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीत सुपरवायजर ऑफिसर पाठवून वस्तुस्थितीची शहानिशा करून योग्य ती चौकशी केली जाईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
अनिकेत पाटील, रोहा गटविकास अधिकारी

Exit mobile version