जमीन व्यवहारात फसवणूक; बारा जणांविरोधात गुन्हा दाखल

| तळा | वार्ताहर |

बनावट कागदपत्रे तयार करून जमीन व्यवहारात एकाची फसवणूक केल्याची घटना तळा तालुक्यात घडली आहे. फसवणूक करणार्‍या बारा जणांविरोधात तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळा तालुक्यातील मौजे काकडशेत येथील जागा खरेदी करणार्‍या फिर्यादी सदानंद कृष्णा नाखवा, (ता. उरण ) यांनी काकडशेत विभागात जमीन खरेदी केली होती. या जमीन खरेदी व्यवहारात फिर्यादीची बारा जणांनी संगनमत करून जमीन परस्पर विकली. ही जागा 49 लाख 20 हजार रुपये किंमतीची आहे. या प्रकरणी फिर्यादी सदानंद नाखवा यांना अंधारात ठेवून परस्पर पॅनकार्ड, आधारकार्ड, अशी सर्व कागदपत्रे बनावट तयार करून घेऊन विक्री करण्यात आली. ही बाब फिर्यादी सदानंद नाखवा यांच्या निदर्शनाच येताच त्यांनी तळा पोलीस ठाण्यात 1 मार्च रोजी फिर्याद दिली असून फसवणूक केलेल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फसवणूक प्रकरणात सागर उगले (रा. माणगाव), आदित्य पाटील (रा. पागोटे उरण ), विशाल सावंत ( रा. काळुंद्रे पनवेल), रिहान शेख (रा. मोर्बा माणगाव), हजरीमल मारवाडी (रा. गोरेगाव मुंबई), सचिन सापळे (रा. विघवली माणगाव), संतोष गुप्ता (रा. भिंगारी पनवेल), विनोद कापसे (रा. कोलाड), संतोष पवार (रा. निजामपूर रोड माणगाव), आकाश पवार (रा. निजामपूर रोड माणगाव), तलाठी काकडशेत, दुय्यम निबंधक तळा अशा एकूण 12 आरोपींनी फिर्यादी सदानंद नाखवा यांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तळा पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक भालचंद्र पवार करत आहेत.

Exit mobile version