। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात दाखल झाला असताना काही व्यापार्यांकडून इतर जातीच्या आंब्यांची हापूसच्या नावाने विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी बाजार समितीने अशा व्यापार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
चार डझनच्या आंब्याच्या पेटीमध्ये पहिल्या थरावर हापूस ठेवला जातो. त्यानंतर खालच्या थरांमध्ये इतर जातीचे तसेच अपरिपक्व असलेले आंबे भरले जातात. एकदा का पेटी घरी गेली की सहसा कोणी आंबे परत घेण्यासाठी येत नाही. ग्राहकांच्या याच मानसिकतेचा फायदा घेत एपीएमसीतील काही व्यापार्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत आहे.