| पनवेल | वार्ताहर |
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले आहे. अनेक लोक ‘शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि जास्त नफा मिळवा’ अशा आमिषांना बळी पडतात. फसवणूक करणारे विविध अॅप्स किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना खोट्या आश्वासनांनी आकर्षित करून त्यांच्याकडून पैसे उकळतात. अशाच प्रकारे खारघरमध्ये राहणाऱ्या एका 54 वर्षीय गृहस्थाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे.
खारघरमध्ये राहणाऱ्या अनिरूध्द कुलकर्णी यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. कुलकर्णी हे राहते घरी असतांना इंस्टाग्रामवर दिव्यांगना थोरात व अपस्टॉक सेक्युरिटीज हे अॅप चालविणाऱ्या विनीता पडोदिया नावाच्या दोन अज्ञात महिलांनी संगनमत करून कुलकर्णी यांना शेअर मार्केट संबंधीत मार्गदर्शनपर मॅसेज पाठवत त्यांचा विश्वास संपादन केला व शेअर मार्केट ट्रेडींग केल्यास तुम्हाला मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून, कुलकर्णी यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून त्याआधारे त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले व याबाबतचा परतावा न देता फसवणूक केली. याबाबत कुलकर्णी यांनी खारघर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.