। पनवेल । वार्ताहर ।
वैमानिक प्रशिक्षणाच्या नावाखाली तरुण प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. एका संस्थेचे संचालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वैमानिक प्रशिक्षणाच्या नावाखाली चार प्रशिक्षणार्थी मुलींकडून तब्बल 2 कोटी 39 लाख रुपये उकळल्याचा आरोप पालकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. बोरीवली येथील 58 वर्षांचे सेवानिवृत्त एअर इंडिया कर्मचारी हे पीडित प्रशिक्षणार्थी मुलीचे पालक आहेत. त्यांनी मुलीच्या प्रशिक्षणासाठी 54 लाख रुपये (करांसह) या संस्थेत भरले होते. सप्टेंबर 2024 पासून खारघर येथील कार्यालयातून प्रशिक्षणाचे कामकाज सुरू होते. मुलींना दुबईमधील एका संस्थेत पाठवण्यात आले. मात्र, पूर्ण शुल्क न भरल्याने प्रशिक्षण थांबविल्याने प्रशिक्षणार्थीना भारतात परतावे लागले. अद्याप या प्रकरणातील संशयीत आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.







