गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवत फसवणूक

| पनवेल | प्रतिनिधी |

गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवत सायबर भामट्यांनी खांदा कॉलनीतील सुभाष बाबाराव तारे (70) यांची तब्बल 5 लाख 28 हजार 364 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तारे यांच्या मोबाईलवर ‌‘डिअर पाईपलाईन एमजीएल गॅस युजर’ असा संदेश पाठवून मागील महिन्याचे मीटर रीडिंग अद्ययावत झाले नसल्याचे सांगण्यात आले. रात्री 9.30 वाजता गॅस कनेक्शन बंद होईल, अशी भीती दाखवत ‌‘बिल अपडेट ऑफिसर’च्या नावाने दिलेल्या क्रमांकावर संपर्क करण्यास सांगण्यात आले. तारे यांनी संपर्क साधल्यानंतर भामट्यांनी बिल अद्ययावत करण्यासाठी 13 रुपये भरण्यास सांगितले. संशय आल्याने त्यांनी प्रक्रिया थांबवली; मात्र तोपर्यंत त्यांच्या बँक खात्यातून 5 लाख 28 हजार 364 रुपये परस्पर काढण्यात आले होते. त्यांनी तत्काळ 1930 सायबर हेल्पलाईनवर तक्रार करून खांदेश्वर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांकडून मोबाईल क्रमांक, बँक व्यवहार आणि खात्यांची माहिती तपासली जात आहे. गॅस, वीज, बँक किंवा अन्य संस्थांच्या नावाने आलेल्या संदेशांवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित संस्थेच्या अधिकृत ग्राहक सेवा क्रमांकावरून खात्री करावी. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, अनधिकृत ॲप डाउनलोड करू नये तसेच ओटीपी, यूपीआय पिन आणि बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Exit mobile version