तक्रारी व पोलखोलीनंतर कारवाई
| उरण | प्रतिनिधी |
शहरातील शकुंतला गॅस एजन्सीचे लायसन्स भारत गॅसकडून निलंबित करण्यात आले असून, सदर एजन्सीचा गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. ग्राहकांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी तसेच स्थानिक पत्रकारांनी केलेल्या सातत्यपूर्ण पोलखोलीनंतर प्रशासनाने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
तहसीलदार उद्धव कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीच्या कामकाजाबाबत अनेक गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास करून संबंधित एजन्सीवर कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून, शकुंतला गॅस एजन्सीतील सर्व ग्राहकांचे गॅस कनेक्शन पनवेल गॅस एजन्सी तसेच सुविधा गॅस एजन्सी, पनवेल यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. ग्राहकांनी गॅस बुकिंग करताना आपला जुना कंझ्युमर नंबरच वापरावा, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच गॅस सिलेंडरची घरपोच सेवा पूर्ववत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर तरी गॅस पुरवठा सुरळीत व वेळेवर व्हावा, अशी मागणी ग्राहकांकडून जोर धरू लागली आहे. वारंवार होणाऱ्या गैरसोयीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता नियमित आणि विश्वासार्ह सेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







