7 कोटी 50 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
बांधकाम व्यावसायिक एम.पी. ग्रुपने गुलशन रहिवासी संस्थेचे सचिव अस्लम परदेशी आणि पदाधिकारी यांना हाताशी धरून येथील व्यावसायिक गाळेधारकांना अंधारात ठेवण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप आदिम सईद मुल्ला यांनी सोमवारी (दि.11) आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे. यावेळी त्यांच्या खोट्या सह्या असलेले कागद त्यांनी पत्रकारांसमोर ठेवून या प्रकरणाचा उलगडा केला आहे. यावेळी त्यांचे तब्बल 7 कोटी 50 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी समोर आणले. तसेच, पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करताना चुकीचा तपास केला तसेच, आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा दुसरी चार्जशीट बनविली आणि अधिक कलम लावले असल्याची माहितीही मुल्ला बंधूंनी यावेळी दिली.
शहरातील अंतिम भूखंड क्र. 278/4 या या भूखंडावर गुलशन सोसायटी उभी होती. मात्र, बांधकाम व्यावसायिक एमपी होम्स यांच्याबरोबर सोसायटीचे सचिव अस्लम परदेशी व इतर पदाधिकार्यांसह केलेला पुनर्विकासाचा करारनामा सोसायटीचे सभासद रमिज सईद मुल्ला आणि आदिम सईद मुल्ला यांना अंधारात ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याबाबत मुल्ला यांनी 18 मे 2022 रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून गुन्हा दाखल केला. मात्र, या एफआयआरचा तपास चुकीच्या दिशेने झाला असल्याचा आरोप करीत गतवर्षीदेखील त्यांनी पत्रकार परिषदेतून समोर आणले होते. त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी पुन्हा नव्याने तपास करून दुसरी चार्जशीट बनविली आणि 120 (ब) हे अधिकचे कलम त्यामध्ये लावले. त्यामुळे एमपी होम्सचे मंगेश परुळेकर यांच्यासह गुलशन सोसायटीचे सचिव अस्लम परदेशीवर अटकेची टांगती तलवार राहिली.







