। नेरळ । प्रतिनिधी ।
शेलु रेल्वे स्थानक परिसरात गृह संकुल उभारून घरे देण्याचे आमिष दाखवणार्या बिल्डरकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ग्राहकांनी पैसे भरून ही घरे मिळत नसल्याने अखेर नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
कर्जत तालुक्यातील शेलू गावात बिल्डर सुशील कैलासचंद्र मोदी आणि सचिन मारुती मोरे यांनी मे. राजलक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतर्फे राज हाईट्स नावाने बिल्डींगचे बांधकाम केले होते. या बिल्डींगमधील सदनिकांची बुकिंग सुशील मोदी आणि सचिन मोरे यांच्यामार्फत करण्यात आली होती. या ठिकाणी घर घेण्यासाठी नितेश खवळे, त्रिशला सावंत, सुनिल जाधव, समीर मिरकुटे, प्रकाश खवळे, दयानंद खराडे, आशा अवचिते, मीनाबाई भाई, सागर दादर, अरुणा बनसोडे, अरुण सोनावणे, देविदास भालेराव, पुंडलिक कागीनकर आदी 13 ग्राहकांनी सदनिका बुकिंग केली होती. हे सर्व ग्राहक कल्याण, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी राहणारे आहेत. बुकिंग करतेवेळी त्यांनी आगाऊ रक्कम दिली तसेच इतर रक्कम त्यांच्या नावे बँकांकडून कर्ज घेऊन बुकिंग केली होती.
बिल्डर सुशील मोदी आणि सचिन मोरे यांच्याकडून ग्राहकांना घराचा ताबा लवकरात लवकर देऊ असे कबुल करण्यात आले होते. मात्र, पाच वर्ष पूर्ण होऊन देखील सदनिका धारकांना ताबा मिळाला नाही. ग्राहकांच्या खिशातून आजपर्यंतची कर्जाच्या हप्त्याची रक्कम सुशील मोदी आणि सचिन मोरे यांच्या बँक खात्यावर जमा होत आली आहे. सर्व सदनिका धारकांची बिल्डरकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुशील मोदी आणि सचिन मोरे यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन कर्जत पोलीस उप अधीक्षक यांना देण्यात आले आहे.