| नाशिक | वृत्तसंस्था |
आर्किटेक्ट असलेल्या व्यावसायिकाकडे काम शिकण्यासाठी असलेल्या युवतीने तब्बल 5 लाख 43 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित युवतीविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक्षा अनिल मोरे रा. पाथरथेंबे- चांदवड असे संशयित युवतीचे नाव आहे.
आर्किटेक्ट निलेश अर्जून दळवी रा. ध्रुवनगर- कॅनॉलरोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे गोविंदनगर येथील विश्वज्योती अपार्टमेंटमध्ये आस्थापना आहे. त्यांच्याच शेजारील आस्थापनेमध्ये संशयित प्रतिक्षा मोरे ही नोकरीला होती. परंतु, वेळ काढून ती दळवी यांच्याकडे काम शिकण्यासाठी येत असे. याच दरम्यान, तिने दळवी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने दळवी यांच्याकडे स्वत:ला व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी केली. त्यावेळी त्यांनी तिला कधी रोख तर कधी ऑनलाईन स्वरुपात 5 लाख 43 हजार रुपयांची मदत केली. संशयित युवतीने व्यवसाय सुरू केल्यानंतरही दळवी यांना दिलेले पैसे परत केले नाहीत. त्यामुळे त्यांनी संशयितेकडे दिलेल्या पैशांची मागणी केली असता, तिने उलट त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दळवी यांनी मुंबई नाका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयितेविरोधात फसवणूक व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक सुधीर पाटील हे तपास करीत आहेत.