टेलीग्रामवरून लाखोंची फसवणूक

। उरण । वार्ताहर ।

ऑनलाईन टास्क पुर्ण करून पैसे कमविण्याच्या अमिषापाई एका व्यक्तीला तब्बल 19 लाख 43 रूपये फसविल्याची घटना न्हावाशेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कस्थाला ससीकुमार (34) रा. उलवे असे या फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी न्हावाशेवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कस्थाला ससीकुमार यांना टेलीग्रामवरून हॉटेल बुकींग करण्याच्या प्रिपेड टास्क असून त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून टास्क पुर्ण केल्यास तुम्हाला चांगला मोबदला मिळेल असा मेसेज आला. हा मेसेज वाचून एका वेबसाईटवर खाते उघडून टास्क पुर्ण करण्यासाठी आपल्या खात्यावरून पैसे भरण्यास सांगितले. सुरूवातीला कस्थाला यांना त्यांच्या वॉलेटमध्ये काही फायदा झाल्याचे दाखविण्यात आले आणि काही पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर या व्यवसायात चांगला नफा मिळत असल्याचे दिसल्यानंतर कस्थाला यांनी 26 मार्च पासून ते 8 एप्रिलपर्यंत एकूण 19 लाख 43 हजार 385 रूपये वेगवेगळ्या बँक खात्यावरून त्यांनी दिलेल्या खात्यात भरले.

त्यानंतर हॉटेल बुकींग टास्क पुर्ण केल्यावर त्यांच्या नफ्याची रक्कम काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असता त्यांना ते काढता येत नव्हते. त्यानंतर त्यांनी संबधीत व्यक्तींना फोन करून त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना काहीही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे कस्थाला ससीकुमार यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी या बाबत न्हावाशेवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version