यूएमए अ‍ॅपद्वारे अलिबागसह रायगड जिल्ह्यात लाखोंची फसवणूक

महिन्याच्या आतच गुंडाळला गाशा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

शेअर ब्रोकींगमध्ये गुंतवणूकीतून दर दिवशी परताव्याचे आमिष दाखवून अलिबागस रायगड जिल्ह्यातील 1774 ग्राहकांची ऑनलाईन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिन्याभरात गाशा गुंडाळणार्‍या या अ‍ॅपविरोधात बदनामी टाळण्याच्या हेतूने पोलिसात तक्रार करण्यास कोणीही पुढे येण्यास तयार नाही. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

रोज नवनव्या गुंतवणुकीच्या योजना येऊन ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकार घडताना पहायला मिळतात. दामदुप्पट योजनांचे आमिष दाखविले जाते. खोट्या लॉटरीचे मेसेज, इमेल पाठवून सर्रास फसवणुकीचे प्रकार घडत असतात. अशा प्रकारे घोटाळे बहाद्दर रोज नवनव्या क्लृप्त्या लढवत असतात. सध्या शेअर ब्रोकींगबाबत वेगवेगळ्या अ‍ॅपच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचे उघडकीस आले आहेत. यूएमए ब्रोकर नावाने एक अ‍ॅप सुरु करुन त्याद्वारे रोज पाच हजाराला दिवसाला पाचशे रुपयांच्या परताव्याचे आमिष दाखवून सुरुवात करण्यात आली. त्यासाठी यूएमए पाऊल टीमचे व्हॉट्सअ‍ॅप गु्रपदेखील सुरु करण्यात आला. रँडी आणि चार्लोट, जेमस् असे काही अ‍ॅडमीन कार्यरत होते. या अ‍ॅपमध्ये वेगवेगळे नियम सांगण्यात आले. त्यानंतर ज्यांनी सदर अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केले, त्यांना युजरनेम आणि पासवर्ड बनवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सुरुवातीला पाच हजार रुपयांचा रिचार्ज या अ‍ॅपवर मारण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ज्यांनी सदर रिचार्ज मारले, त्यांना दुसर्‍या दिवशी सकाळी आठ वाजता काही ठरावीक ठिकाणी क्लीक केल्यानंतर अ‍ॅपमध्ये पाचशे रुपये जमा होऊ लागले. बघता-बघता दर दिवशी पाचशे जमा होताच गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. आठ दिवसांत आपले गुंतवलेले पाच हजार रुपये आपल्या खात्यात जमा करुन परताव्याच्या पैशातून पुढे गुंतवणूक सुरुच ठेवली गेली. रोजचे पैसे जमा होत असल्याचे पाहून यात कसलाच धोका नसल्याची खात्री होताच एक-एक जण आपल्या जवळच्या व्यक्ती, मित्र, नातेवाईक यांना या योजनेबाबत सांगून त्यांनाही सदर अ‍ॅप डाऊनलोड करुन गुंतवणूक सुरु करण्याचा सल्ला देण्यास सुरुवात झाली. हळूहळू एकेक करीत 10-12 दिवसांतच 1 हजार 774 जणांनी या अ‍ॅपद्वारे गुंतवणूक सुरु केली. तोपर्यंत काहींना 50 ते 60 हजार रुपये परतावादेखील मिळाला होता. काहींनी आपले पैसे वसूल झाल्यानंतरदेखील जास्त पैसे गुंतवल्यास रोजचा परतावादेखील मोठा मिळेल या लोभाने अधिकचे पैसे गुंतवले.

मात्र, गुंतवणूकदाराचीं संख्या एकदम वाढल्याबरोबर अचानक सकाळी 8 वाजता अ‍ॅपवर जमा होणारे पैसे दिसेनासे झाले. बघता-बघता अ‍ॅपच सुरु नसल्याचे आढळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. मात्र, आपला लोभी स्वभाव चव्हाट्यावर येऊ नये यासाठी कोणीही तक्रार करण्यास पुढे येण्यास तयार नाही.

अशा प्रकारची कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र, याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवून फसवणूक करुन घेऊ नये.

सोमथान घार्गे, पोलीस अधीक्षक
Exit mobile version